Center for Citizen Science

Understanding Nature for Better Future

Astronomy

२६ ते २८ जानेवारी दरम्यान पुण्यात महाराष्ट्र खगोल संमेलन

सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) या संस्थेच्या दशकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने राज्यातील विज्ञानप्रेमी नागरिक आणि अभ्यासकांसाठी विविध वैज्ञानिक विषयांवरील कार्यशाळा, संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. शास्त्रीय संशोधन आणि वैज्ञानिक अभ्यासामध्ये राज्यभरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा हे या उपक्रमांमागील मुख्य उद्दिष्ट्य आहे. यातील पहिली ‘वारसा संवर्धन’ या विषयावरील कार्यशाळा डिसेंबर २०२१ मध्ये चिंचवड येथे पार पडली. या शृंखलेतील दुसरा उपक्रम ‘महाराष्ट्र खगोल संमेलन’ येत्या २६ ते २८ जानेवारी दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय आणि खोडद, नारायणगाव येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सीसीएस, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए), फर्ग्युसन महाविद्यालय आणि विज्ञान भारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र खगोल संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. संमेलनामध्ये महाराष्ट्रातील हौशी आकाश निरीक्षक, टेलिस्कोप धारक, हौशी आकाश निरीक्षण संस्थांचे प्रतिनिधी; तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि आकाशप्रेमी नागरिकांचा सहभाग असेल.

महाराष्ट्र खगोल संमेलनामध्ये खगोलीय घटनांचे शास्त्रीय निरीक्षण, खगोलीय छायाचित्रण, खगोलशास्त्र प्रसार आणि ‘बिग डेटा’वर आधारित खगोलशास्त्रीय संशोधन या विषयांवरील कार्यशाळा होणार असून, एकविसाव्या शतकातील खगोलशास्त्राची माहिती देणारी मान्यवर खगोलशास्त्रज्ञांची व्याख्यानेही यावेळी आयोजित करण्यात आली आहेत. जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण असणाऱ्या ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ला (जीएमआरटी) भेट आणि जीएमआरटी येथून सुसज्ज उपकरणांसह रात्रभर आकाश दर्शन हे महाराष्ट्र खगोल संमेलनाचे प्रमुख आकर्षण असेल.

महाराष्ट्र खगोल संमेलनाला प्रा. यशवंत गुप्ता, प्रा. अजित केंभावी, प्रा. योगेश शौचे, प्रा. योगेश वाडदेकर, प्रा. दिव्य ओबेरॉय, प्रा. सुहृद मोरे या शास्त्रज्ञांसह श्री. अरविंद परांजपे, श्री. हेमंत मोने, श्री. समीर धुर्डे आणि मयुरेश प्रभुणे या खगोल अभ्यासकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महाराष्ट्र खगोल संमेलनात हौशी आकाश निरीक्षक, उच्च महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि आकाशप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, नोंदणीसाठी ९७३००३५०१०, ८७६७८३३९०६ या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी https://bit.ly/3ifkiYr पेजला भेट द्यावी.

“महाराष्ट्र खगोल संमेलनाद्वारे खगोल शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्राची आवड असणारे विद्यार्थी व नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अनेक खगोलशास्त्रीय प्रकल्पांमध्ये नागरिक प्रत्यक्षपणे शास्त्रज्ञांना मदत करीत आहेत. आगामी काळात भारतात आणि जगभरात महाप्रकल्प आकाराला येणार आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांना त्या प्रकल्पांविषयीची माहिती महाराष्ट्र खगोल संमेलनातून मिळेल,” – प्रा. यशवंत गुप्ता, संचालक, एनसीआरए

“एकविसावे शतक हे आंतरविद्याशाखीय संशोधनाचे आहे. खगोलशास्त्राला इतरही वैज्ञानिक विषयांची जोड मिळाली तर पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे का, अशा न सुटलेल्या कोड्यांची उत्तरे येत्या काळात मिळू शकतील. फक्त भौतिकशास्त्रच नाही, तर इतरही विज्ञान विषयांच्या विद्यार्थी आणि अभ्यासकांना महाराष्ट्र खगोल संमेलनातील उपक्रम मार्गदर्शक ठरतील,” – प्रा. योगेश शौचे, अध्यक्ष सीसीएस आणि विज्ञान भारती (पश्चिम महाराष्ट्र)    

“राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र खगोल संमेलन पर्वणी असेल. प्रत्यक्ष खगोलशास्त्रज्ञांशी संवाद, जीएमआरटीसारख्या जगप्रसिद्ध संस्थेला भेट, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आकाश निरीक्षण असे उपक्रम विशेष आकर्षण असतील. खगोलशास्त्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आगामी काळातील संधींविषयी संमेलनात माहिती मिळू शकेल,” – डॉ. रवींद्रसिंह परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे.              

1 Comment

  1. Narendra Kulkarni

    अतिशय स्तुत्य उपक्रम.अभिनंदन.

Leave a Reply

Theme by Anders Norén